अहमदनगर :- सध्या भाजपमध्ये असणारे भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा कोणत्याही परिस्थिती लढवायचीच ही भूमिका घेत आहेत. त्यांची ही भूमिका युती विरोधी व पक्ष विरोधी आहे. ही भूमिका घेण्यापूर्वी पक्ष्याने त्यांना दिलेले श्रीसाईबाबा संस्थानचे ट्रस्टी पद सोडणे गरजेचे होते.
मात्र, आयुष्यात केवळ पद मिळवण्यासाठी झटणाऱ्या वाकचौरेंकडून ही अपेक्षा व्यर्थ असल्याने त्यांना ट्रस्टी पदावरून काढण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन उदमले यांनी केले आहे.
शिर्डीची जागा युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. सेनेकडे उमेदवारी मागताना भाजपने दिलेले पद का सोडले नाही? तुम्ही अपक्ष उमेदवारी करू म्हणता, इथे सगळे कार्यकर्ते मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जीवाचे रान करत असताना वाकचौरे युतीच्या उमेदवाराविरुद्ध लढण्याची गोष्ट करतात.
म्हणजे वैयक्तिक स्वार्थ हेच त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान आहे. ते जेव्हा सेनेतून काँग्रेसमध्ये आले व पडले. त्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांना राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर घेतले. मात्र, पुन्हा काँग्रेस सोडून भाजपत उमेदवारी करताना त्यांनी विद्यापीठाचे पद सोडले नाही.
माझ्या पक्ष प्रवेशास त्यांनी विरोध केला.वास्तविक मी आजही पक्षाकडे कोणतेही पद मागितलेले नाही. तरीही मला स्पर्धक मानून वाकचौरे मला विरोध करत राहिले. मात्र, मी प्रतिक्रिया दिली नाही. आता ते पक्ष विरोधी भूमिका घेत असल्याने त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे.
त्याच बरोबर पक्षातील जे लोक त्यांच्या पक्षविरोधी भूमिकेचे समर्थन करत आहेत, त्यांचीही माहिती कळवणार आहे. वाकचौरेंनी तत्काळ शिर्डी संस्थानचा राजीनामा द्यावा; अन्यथा त्यांना या पदावरून काढण्यासाठी विनंती करणार आहे. त्यामुळे पक्षात अनेक पात्र कार्यकर्ते आहेत. त्यांना संधी मिळेल व अशा प्रवृत्तींना चपराक बसेल, असेही उदमले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.