१५ वर्षापासून फरार असलेल्या सुरेशच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- ३८ वर्षापूर्वी दाखल दरोडयात गुन्ह्यात शिक्षा लागलेल्या व उच्च न्यायालय खंडपीठ (औरंगाबाद) येथे अपीलामध्येही शिक्षा कायम झालेला व १५ वर्षापासून फरार असणारा आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

सुरेश महादू दुधावडे (रा. बाडेगव्हाण ता. पारनेर जि.अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पारनेर पोलिस ठाण्यात गुरनं. १३७/१९८३ भादंवि कलम ३९७.३४ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल होता.

या गुन्हयात आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी आरोपी सुरेश महादू दुधावडे (रा. वाडेगव्हाण ता. पारनेर) व इतर आरोपी याना सेशन केस ९४/१९८४ यामध्ये सुनावणी अंती ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.

या शिक्षेविरुध्द आरोपीने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ (औरंगाबाद) येथे शिक्षेविरुध्द आपिल दाखल केले होते. उच्च न्यायालय (औरंगाबाद) येथे आपिलावर सुनावणी झाली. त्या सुनावणीत आरोपीची शिक्षा कायम करण्यात आली होती. यानंतर आरोपी सुरेश महादू दुधावडे हा दि. १४ ऑक्टोबर २००५ पासून फरार झाला होता.

उच्च न्यायालय खंडपीठ (औरंगाबाद) याचेकडून आरोपीचे शोधासाठी सूचित करण्यात आले होते. गुन्हा घडला त्यावेळी आरोपी सुरेश दुधावडे हा मजुरीचे कामानिमित्त वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथे राहावयास आलेला होता.

त्यामुळे त्याच्या मूळ वास्तव्याबाबत कोणालाही काहिएक सांगता येत नव्हते. तेव्हा अनेक प्रयत्न करूनही आरोपी दुधावडे याच्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणाबाबत माहिती मिळत नव्हती.

आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्ह्यातील फिर्यादी, साक्षीदार तसेच जामिनदार यांचेकडे ही चौकशी करुनही माहिती मिळत नव्हती, तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी आरोपी दुधावडेचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले.

पथकाने आरोपोची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली. आरोपी सुरेश महादु दुधावडे हा नारायणगाव परिसरातील ठाकरवाडी परिसरात वास्तव्यास आहे,

अशी माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी नारायणगाव (ता जुन्नर जि. पुणे) येथे जाऊन नारायणगाव पोलिस ठाण्याचे सपोनि पृथीराज ताटे व सफौ कोकणे,

पोकाॅ तांबे यांचे मदतीने ठाकरवाडी परिसरात आरोपीचा शोध घेतला. आरोपी सुरेश महादु दुधावडे हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. आरोपी दुधावडे याला पारनेर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले, पुढील तपास पारनेर पोलिस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe