संगमनेर: भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या मांजराला पकडण्याच्या नादात विहिरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला. तुडुंब पाण्याने भरलेल्या विहिरीत बिबट्याने कठड्याचा आधार घेतला.
ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने बिबट्याला अलगद बाहेर काढले. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील आंबीदुमाला येथे उघडकीस आली.
आंबीदुमाला येथील शेतकरी डॉ. संतोष इथापे यांच्या विहिरीत भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्याला मांजर दिसली. मांजराला पकडण्याच्या नादात बिबट्याला विहिरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला.
तुडुंब पाण्याने भरलेल्या विहिरीत बिबट्याने कठड्याचा आधार घेतला. हा बिबट्या सोमवारी रात्री हा बिबट्या विहिरीत पडला होता. सकाळी बिबट्याच्या आवाजाने काही नागरिक विहिरीकडे धावले. विहिरीत बिबट्या पडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.
या घटनेची खबर डॉ. संतोष इथापे यांनी दिली. उपविभागीय वन अधिकारी अनिल तोरडमल, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश आखाडे, बोट्याचे वनरक्षक दिलीप उसाळे, घारगावचे सुभाष धानापुरे, वनमजूर तान्हाजी फापाळे, आनंदा काळे, बाळासाहेब वैराळ, घारगावचे वनपाल आर. के. थेटे, रवी पडवळे यांनी बिबट्याला वर काढले.