पेगासस प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल

 

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  सध्या देशात पेगॅसस प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता या प्रकरणी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.

पेगॅसस या इस्रायली स्पायवेअरच्या कथित वापराबाबत सर्वोच्च न्यायालयात एक नवी याचिका सादर करण्यात आली आहे. २०१७ मध्ये झालेल्या १५ हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र कराराच्या वेळी भारताने इस्रायलकडून पेगॅसस स्पायवेअर खरेदी केले, असा दावा अमेरिकेतील एका वृत्तपत्राने केल्यानंतर देशात खळबळ माजली आहे.

दरम्यान पेगासस हेरगिरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातआता नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील मूळ याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅड. एम.एल. शर्मा यांनी ही याचिका केली आहे.

या कराराला संसदेने मंजुरी दिलेली नव्हती व त्यामुळे हा करार रद्द करून, त्याची रक्कम वसूल करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी योग्य ते निर्देश द्यावेत; तसेच जनहितार्थ वादग्रस्त पेगॅसस स्पायवेअर खरेदी कराराचा व जनतेच्या पैशांच्या कथित गैरवापराचा तपास करावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.

पेगासस म्हणजे काय? पेगासस हा स्पायवेअरचा एक प्रकार आहे. हे लोकांच्या फोनद्वारे त्यांची हेरगिरी करते. पीबीएनएसच्या अहवालानुसार, पेगासस एक लिंक पाठवते आणि जर वापरकर्त्याने त्या लिंकवर क्लिक केले तर त्याच्या फोनवर मालवेअर किंवा देखरेखीसाठी परवानगी असलेला कोड इन्स्टॉल होतो.

असे सांगितले जात आहे की मालवेअरच्या नवीन आवृत्तीसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करणे आवश्यक नाही. एकदा पेगासस इन्स्टॉल झाल्यानंतर, हल्लेखोराकडे वापरकर्त्याच्या फोनची संपूर्ण माहिती असते.