अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगाव :- माजी आमदार नरेंद्र घुले वा त्यांचे बंधू माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी मिळण्यासाठी त्यांचे समर्थक सरसावले आहेत. दोघांनाही विधानसभेच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
पक्षाचे निष्ठावान म्हणून व अनुभवी समाजकारणी, राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नगर जिल्ह्यातील सर्वांत ज्येष्ठ व पक्षाशी एकनिष्ठ तसेच अडचणीच्या काळात पक्ष वाढीचे काम करणाऱ्या घुले बंधूंना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा व उपाध्यक्ष डॉ. शैलेश मोहिते नुकतेच नगरला राष्ट्रवादी भवनात आले असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर घुले बंधूंना विधान परिषदेवर आमदारकीची संधी मिळण्याची मागणी शर्मा व मोहितेंकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्यात सर्वात प्रथम पक्षाला साथ देण्याचा निर्णय (स्व.) मारुतराव घुले यांनी घेतला आणि तोच विचार त्याचे चिरंजीव घुले बंधूंनी पुढे नेला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसला बळ देण्याचे काम दोन्ही बंधूंनी केले. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेवासा तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शंकरराव गडाख यांना आमदार करण्यात या बंधूंचा सिंहाचा वाटा आहे, असा दावाही या निवेदनात करण्यात आला आहे.