अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : महाविद्यालयीन विद्याथ्र्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला; मात्र विद्याथ्र्याच्या सतर्कतेमुळे तो फसला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
शहरातील वरूण विशाल फोपळे (वय १७) हा विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकतो. त्याने खासगी शिकवणी लावली आहे. तो खासगी शिकवणीसाठी अखंडानंद आश्रमाजवळ सायंकाळी पाच वाजता गेला असता एका मोटारीतून तिघेजण त्या ठिकाणी आले.
त्यातील एकाने वरूण यास तुझा मी मामा आहे. तुझ्या आईने तुला घरी बोलाविले आहे, असे सांगून आपले नाव निलेश फिरोदिया असल्याचे सांगितले. वरूण याच्या बरोबर मारवाडी भाषेत त्याने संवाद केला.
मात्र, फिरोदिया आडनावाचे आपले कोणी मामा नाही, असे वरूणाला माहिती असल्याने त्याने वडिल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विशाल फोपळे यांना दूरध्वनी केला.
वरूणने दूरध्वनी करताच मोटारीतील तिघांनी पळ काढला; मात्र जाताना त्यांनी वरूणला हात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. गर्दीचे ठिकाण असल्याने अपहरणकर्त्यांनी मोटार जोरात पळविली.
या प्रकरणी विशाल फोपळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट याप्रकरणी तपास करीत आहेत.