अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोल्हार : सिन्नरहून कोल्हारकडे घरी जात असताना दुचाकी व ट्रकच्या धडकेत कोल्हार येथील सूरज आत्माराम चौधरी (वय २६, रा. कोल्हार) याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना संगमनेरजवळील सायखिंडी गावाजवळ घडली.
शनिवारी सिन्नर येथील मायलॉन कंपनीमधून आपली ड्युटी संपवून सूरज चौधरी दुचाकीवरून (क्र. एम.एच. २७ बी.सी. ७४९६) कोल्हार येथील घरी निघाले होते. मात्र, सायंकाळी सायखिंडी गावाजवळ हायवा कंपनीच्या डंपरला (एम.एच. १७ बी.वाय. ५९९९) दुचाकीने मागील बाजूने जोरात धडक दिल्याचे समजते.
अपघातात सूरज चौधरी यास डोक्यास मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सूरज चौधरी याचा नुकताच साखरपुडा झालेला होता. मात्र, लग्नापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मयत सूरज याच्या वडिलांचे मागील वर्षीच निधन झाले होते. त्यानंतर आता सूरज याचे अपघाती निधन झाल्याने चौधरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मयत सूरज यांच्या पश्चात एक भाऊ व आई असा परिवार आहे. घटनेनंतर ट्रक चालकास संगमनेर पोलिसांनी गाडीसह ताब्यात घेतले आहे.