अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- सरकारी कामात अडथळा आणून महिला ग्रामसेविकेला शिवीगाळ करणारा दुकानदारास पाच हजार रूपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने देत एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडले.
शिवाजी उर्फ अमोल पंढरीनाथ शिंदे (रा. बाराबाभळी ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान याच खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदार बाराबाभळीचे सरपंच माणिक केरू वागस्कर यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्हि. यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.
सप्टेंबर 2018 मध्ये दुकानदार शिंदे याने ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन व्यवसाय दाखल्याची मागणी करत महिला ग्रामसेविका यांच्याशी हुज्जत घातली होती.
त्यावेळी सरपंच, सदस्य व नागरिकानी त्याला समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याने त्यांनाही अरेरावीची भाषा केली. त्यामुळे याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात येथे महिला ग्रामसेविका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदे विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने 5 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला पुरावा, साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राहय धरून न्यायालयाने वरील निकाल दिला आहे. या खटल्यात सहायक फौजदार लक्ष्मण काशिद व हेड कॉन्स्टेबल पी. ए. पाटील यांनी सहकार्य केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम