अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Ahmednagar News :- सध्या सर्वत्रच महावितरण प्रशासनाने वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतल्याचे गावागावांत दिसून येत आहे.
यातच नेवासा तालुक्यातील गणेशवाडी परिसरातील शेतीपंपाचा विजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.
महावितरण कंपनीकडून पुन्हा एकदा शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कृषी कनेक्शन तोडले जात आहे तर काही ठिकाणी डीपीच बंद केला जात आहे.
महावितरणच्या अडमुढे धोरणामुळे पिके पाण्यावाचून वाया जात आहे. या वारंवार खंडितहोणार्या विजेमुळे शेतकर्यांवर आत्महत्या शिवाय पर्याय उरलेला नसल्याचे सध्या बोलले जात आहे.
गणेशवाडी, लांडेवाडी व परिसरातील शेतकर्यांनी सोनई येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन तेथील अधिकारी यांच्याशी चर्चा करून शेतकर्यांना विज बिल भरण्यासाठी थोडीशी सवलत द्या व खंडित केलेला विजपुरवठा सुरळीत करून द्या अशी विनवणी केली.
परंतु तेथील अधिकारी यांनी आम्ही यामध्ये काहीही करु शकत नसल्याचे सांगत हात वरती केले. वीजबिले भरली नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरण प्रशासनाने सुरू केला आहे. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत शेतकरी सापडला आहे.