अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra News :- कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तब्बल दोन वर्षांनी दहावी आणि बारावीचे परीक्षा पेपर ऑफलाईन पद्धतीने होत आहे. मात्र यंदाचे हे पेपर वेगळ्याच कारणाने गाजत आहे.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात पेपर फुटी प्रकरण बाहेर आल्यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले असताना आता औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेत आणखी एक गैरप्रकार घडल्याचा उघडकीस आला.
औरंगाबाद जिल्ह्यातील निलजगाव येथील लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या पेपरमध्ये विषय शिक्षकाकडून काॅपी व्हिडिओ व्हायरल झाला.
याप्रकरणी या शाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्याचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी, बारावीच्या पहिल्या पेपरच्या वेळी शामियाना टाकून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागल्याने या शाळेची मंडळ मान्यता व शाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
त्यातच दहावीच्या मंगळवारी झालेल्या मराठी पेपरला विषय शिक्षक रोडू हौसा शिंदे यांनी शाळेत येऊन काॅपी पुरवली. माध्यमांच्या प्रतिनिधींनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केल्यावर शिक्षकांनी शेजारील शेतात पळ काढला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य मंडळाच्या अध्यक्षांना सखोल चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार काॅपी पुरवण्यात शाळा दोषी आढळून आल्याचा अंतरिम अहवाल शिक्षणमंत्र्यांना सादर करण्यात आला. शिक्षणमंत्र्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा केली.