अहमदनगर :- ‘डॉ. सुजय विखे यांचे भाजपमध्ये मी स्वागत करतो. त्यांच्या येण्याने पक्ष संघटन वाढू शकते.
पक्षाच्या धोरणानुसार पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, नगरच्या जनतेने तीन वेळा खासदार व एकदा मंत्री केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
‘नगरच्या जनतेच्या प्रेमाच्या ऋणातच मी राहणार आहे व जनतेसाठी यापुढेही पडेल ती कामे करण्यास पुढेच असणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
‘जनसंघासह भाजपच्या स्थापनेपासून मी पक्षाचा संघटनात्मक कार्यकर्ता होतो, आहे व उद्याही राहणार आहे’,
असे आधीच स्पष्ट करून खासदार गांधी म्हणाले, ‘साधा ज्युसचा स्टॉल असणाऱ्या मला पक्षाने नगरसेवक, उपनगराध्यक्ष, तीन वेळा खासदार, एकदा केंद्रीय मंत्री केले आहे.
पक्षाच्या संघटन व अनुशासन या विश्वासावर मी काम करतो आहे. त्यामुळे डॉ. विखे यांच्या पक्षातील प्रवेशाचे मी स्वागत करतो.
त्यांच्या येण्याने पक्ष संघटन वाढू शकेल, असा विश्वासही मला वाटतो,’ असे त्यांनी स्पष्ट केले.