अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news:- गत दोन वर्षांपासून बळीराजा (Farmer) अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. कधी अवकाळी (Untimely Rain), कधी अतिवृष्टी, कधी गारपीट यांसारख्या (Climate Change) हवामानाच्या बदलासमवेतच बळीराजा शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढता बी-बियाणे, खत टंचाई, खत दरवाढ यांसारख्या सुलतानी संकटांमुळे नेहमीच संकटात सापडत असतो.
मात्र, बळीराजा आता एका वेगळ्याच सुलतानी संकटांमुळे भरडताना दिसत आहे, अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) चांदुर रेल्वे या तालुक्यात चांदुर रेल्वे (Chandur Railway) येथिल नाफेड खरेदी केंद्रावर (Nafed Center) बारदाणे नसल्याने चक्क आठ दिवसांपासून खरेदी बंद आहे. यामुळे शेतकरी बांधव आमची थट्टा करताय का? असा संतप्त सवाल आता मायबाप सरकारकडे (Maharashtra Government) उपस्थित करीत आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की राज्य सरकारने शेत मालाच्या खरेदीसाठी तालुकानिहाय नाफेड खरेदी केंद्र सुरू केले आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे देखील चांदुर रेल्वे एपीएमसीमध्ये नाफेड खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाच्या मोबदला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारने नाफेड केंद्रे कार्यान्वित केलीत, मात्र यातही हलगर्जीपणामुळे बोंबाबोंब होताना नजरेस पडत आहे. चांदूर रेल्वे नाफेड केंद्रावर देखील हरभरा खरेदी सुरू करण्यात आली होती.
नाफेड केंद्रावर हरभऱ्याला खुल्या बाजारपेठेपेक्षा एक हजार रुपये अधिकचा दर मिळत असल्याचे सांगितले गेले. हरभऱ्याला खुल्या बाजारपेठेपेक्षा अधिकचा दर मिळत असल्याने कागदपत्रांची तमा न बाळगता शेतकरी बांधवांनी हरभरा विक्री करण्यासाठी आपला मोर्चा चांदुर रेल्वे एपीएमसी मधील नाफेड केंद्राकडे वळवला.
मात्र, आता चांदुर रेल्वे च्या या नाफेड केंद्रावर काय म्हणे तर माल ठेवण्यासाठी बारदाने नाहीत! बरं, बारदाने नाहीत मग एक-दोन दिवसात बारदाने उपलब्ध करा. पण नाही या नाफेड केंद्रावर बारदाने नाहीत म्हणून चक्क आठ दिवसांपासून हरभरा खरेदी पूर्णतः बंद आहे.
या नाफेड केंद्रावर सुमारे 2600 हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. यासाठी शेतकरी बांधवांना अनेक कागदपत्रांची पूर्तता देखील करावी लागली आहे. मात्र आपल्या शेतमालाला अपेक्षित दर मिळेल या आशेने शेतकरी बांधवांनी मोठा आटापिटा करून आपली नोंदणी करून घेतली.
हाती आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या नाफेड केंद्रावर केवळ 400 हरभरा उत्पादक शेतकर्यांचा हरभरा खरेदी केला गेला आहे. अर्थात अजूनही 2200 शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे शेष आहे. खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असून नाफेड केंद्रावर हरभरा 5200 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.
नाफेड केंद्रावर खुल्या बाजारपेठेपेक्षा 1 हजार रुपये अधिक दर मिळत आहे. यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा नाफेड खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी वळवला.
मात्र, आता बारदाने नसल्यामुळे येथील खरेदी बंद आहे. यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष बघायला मिळत आहे. चांदुर रेल्वे तालुक्यात अजूनही हरभरा काढण्याचे कार्य प्रगतीपथावर असून अनेक शेतकऱ्यांचे हरभरा काढणी पूर्ण झाली असून आता बाजारपेठेत विक्री करण्यासाठी तयार आहेत.
अशा परिस्थितीत नाफेड चे खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारपेठेत आपला शेतमाल विक्री करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून मायबाप शासन शेतकऱ्याला फसवत आहे की काय? असा खोचक सवाल आता उपस्थित केला जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, या नाफेड खरेदी केंद्रावर दिवसाकाठी 1500 क्विंटल हरभऱ्याची खरेदी होत असते अर्थात गत आठ दिवसात आठ हजार क्विंटल हरभरा खरेदीचे नुकसान झाले आहे.
याबाबत नाफेड केंद्रावर विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, वरिष्ठांशी तात्काळ या बाबत संवाद साधला असून लवकरात लवकर बारदाने उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.