अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Maharashtra news : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस.p जगनमोहन रेड्डी यांनी आज एक धाडसी निर्णय घेतला आहे. त्यांनी एका दिवसात राज्यातील जिल्ह्यांची संख्या दुप्पट केली आहे.
त्यामुळं तिथं आता १३ ऐवजी २६ जिल्हे झाले आहेत. महाराष्ट्रात मात्र अहमदनगरसह आणखी काही जिल्ह्यांचं विभाजन करून नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी निवडणुकीत जनतेला तसं आश्वासन दिलं होतं. मात्र, एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येनं जिल्ह्यांची निर्मिती केली जाईल, असे कोणालाच वाटलं नव्हतं.
त्यामुळं आता आंध्र प्रदेशमधील एकूण जिल्ह्यांची संख्या १३ वरून आता थेट २६ झाली आहे. नव्या जिल्ह्यांची निर्मिती केल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही फेरबदल केले आहेत.
नवनिर्मित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्याकडं महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांच्या विभाजनाचा प्रश्न प्रलंबित आहे.
काही ठिकाणी तो मार्गी लागला. मात्र अहमदनगर जिल्ह्याचा प्रश्न कित्येक वर्षे रखडला आहे. या काळात अनेक सरकारे आली गेली, मात्र यासंबंधी निर्णय झाला नाही.