अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Ahmednagar News :- एसटी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात सरकारला अपयश आल्यानेच हा उद्रेक आता रस्त्यावर आला आहे. आंदोलन करण्याचा हा मार्ग नाही.
परंतू झालेल्या गोंधळाला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. एसटी कामगार पाच महीन्यांपासून आंदोलन करीत आहेत.

१२५ कामगारांचे बळी गेले.तरीही सरकार शांत बसून होते.केवळ त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाचे कारण पुढे करुन सरकार वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत बसल्याची टिका करून आ.विखे म्हणाले की सरकारने कामगारांना विश्वासात घेवून त्यांच्याशी संवाद सुरू ठेवायला हवा होता,
परंतू सरकार मधील प्रत्येक मंत्री फक्त कायदेशीर कारवाई करण्याचा धाक दाखवून कामगारांवर दडपशाही करीत असल्यामुळेच सरकारच्या विरोधातील रोष आता रस्त्यावर आला असल्याचे विखे म्हणाले.
कोणत्याही नेत्याच्या घरावर जावून असे आंदोलन करणे हा मार्ग नाही, परंतू सरकारनेच या कमगारांवर आशी वेळ आणली. त्यामुळेच कामगारांनी रस्त्यावर येवून केलेल्या उद्रेकाला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा थेट आरोप विखे पाटील यांनी केला.
नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात कामगारांच्या संपाबाबत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात होती परंतू सरकारला चर्चा करायची नव्हती.
केवळ बैठका चर्चा आणि तीन सदस्यांची समिती नेमण्याचा फार्स करून महाविकास आघाडी सरकारने कामगारांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे विखे पाटील म्हणाले.