अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक केसरकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, अशी चर्चा होती.
शिवसेनेच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांना तसेच मागील सरकारमध्ये महत्त्वाची कामगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ विस्तारात संधी देतील, अशी अपेक्षा वर्तवली जात होती. परंतु सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला.
परंतु या नेत्यांची नाराजी उद्धव ठाकरे कशी दूर करणार ? मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वजन असल्याने या भागातील आमदारांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून ‘मातोश्री’वर इच्छुकांनी गर्दी केली होती.
अनपेक्षितपणे नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतल्याने ज्येष्ठ नेत्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. उघडपणे यावर कोणीही भाष्य करत नसले तरी नाराज नेत्यांचा गट लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त करणार असल्याची चर्चा आहे.
त्याचबरोबर सर्वसामान्य सैनिकांमध्ये देखील आपल्या नेत्यांना डावलण्यात आल्याने अस्वस् थता पसरली आहे. परिणामी आता नाराज नेत्यांची मनधरणी उद्धव ठाकरे कसे करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.