मुंबई : सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजपवर (BJP) सडकून टीका करण्यात आली आहे. हिंदुत्वाच्या (Hindutva) नावाखाली भाजप कसे देशात हिंदू (Hindu) आणि मुस्लिम (Muslim) यांच्यात भांडणे लावण्याचे काम करत आहे असा आरोपही सामनातून करण्यात आला आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, भाजपचे नवहिंदुत्ववादी देशात फाळणीपुर्व परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) समाजात धार्मिक द्वेशभावना रूजविण्यासाठी एका शतकाची रणनीती आखली असावी अशी भीती डॉ. अभय बंग (Dr. Abhay Bang) यांनी व्यक्त केली आहे.
बंग यांचे म्हणणे असे की, संघाने स्थापनेनंतरच्या काळात कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही. या काळात ते त्यांना अपेक्षित समाजमन घडविण्याचे काम करीत होते. यासाठी त्यांनी शिक्षण, विविध संस्था, साहित्य नाटक व इतर साधनांचा वापर केला.
डॉ. बंग यांनी जे विचार व्यक्त केले ते जेएनयू पासून कर्नाटकपर्यंत खरे होताना दिसत आहेत. धार्मित द्वेशाचे राजकारण देशाचे पुन्हा तुकडे तुकडे करील. बालमनावर रूजवलेले द्वेषाचे बीज ही पिढी संपल्यावर संपेल असे डॉ. बंग सांगतात.
त्याआधी असंख्य फाळण्यांचे बीजे रूजलेली असतील. नवहिंदुत्ववादी उन्मत्त लोकांना याची चिंता वाटेल काय? असा प्रश्न सामनातून करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व मतलबी आणि तकलादू आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यापासून ते दंगली घडविण्यापर्यंत या लोकांचा हात आहे.
एका बाजूला अखंड हिंदुत्वाचे गिरमिट चालवायचे आणि दुसऱ्या बाजूला धर्मात तेढ निर्माण करून देशाचे तुकडे होतील असं वातावरण निर्माण करायचं. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, आम्ही भाजपाला सोडले आहे हिंदूत्वाला नव्हे असे मुख्यमंत्री जाहीरपणे म्हणाले आहेत.
त्यामुळे भाजपाचे हिंदुत्वाशी काही देणघेण नसून हिंदु आणि मुस्लिम यांच्यात भांडण लावण्याचं काम करीत आहे. परवा दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात मांसाहारी जेवणावरून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली.
भाजपची लोक महागाईवरती बोलत नाहीत. ती खाण्यावरून देशात हिंसा घडविण्याचे काम करीत आहेत अशी टीकाही सामनातून भाजपवर करण्यात आली आहे.