अदानींमुळे वीज टंचाई? ऊर्जा मंत्र्यांना नेमकं म्हणायचंय काय?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 maharashtra news : राज्यात वीज भारनियमनाचे चटके बसत असताना ही वेळ कोणामुळे आली, यावर उलटसुटल चर्चा सुरू आहेत. ‘महावितरण कंपनीला अदानी पॉवरच्या तिरोडा प्रकल्पातून २१०० मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित असताना १७६५ मेगावॉट वीजच उपलब्ध होत आहे.

त्यामुळे टंचाईत भर पडून वाढीव भारनियमाची वेळ आली आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. आतापर्यंत कोळसा टंचाई आणि केंद्राचे धोरण यावर यासाठीचे खापर फोडले जात होते.

आता अदानींच्या कंपनीकडेच बोट दाखविण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. भारनियमन वाढल्याची कबुली देताना ऊर्जा मंत्र्यांनी ते का करण्याची वेळ आली, याची माहिती दिली आहे.

अदानींकडून ठरल्यापेक्षा कमी वीज मिळत असल्याचे सांगताना त्यांनी इतर कंपन्या आणि केंद्र सरकारकडूनही वीज मिळत नसल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले, जेएसडब्ल्यूकडून १०० मेगावॉट वीज मिळालेली नाही. केंद्रीय प्रकल्पांमधून ७६० ऐवजी ६३० मेगावॉटच वीज दिली जात आहे.

महानिर्मितीला केंद्र सरकारकडून कोळसा मिळत नाही. सध्या १४ हजार मेगावॉटची तूट आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागत आहे.

‘कोळसा टंचाई व बाजारातही खरेदीसाठी वीज उपलब्ध नसल्याने भारनियमनाचा कालावधी सांगता येणार नाही. ग्राहकांनी विजेची काटकसर करावी’, असे सांगून हे संकट एवढ्यात संपणारे नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe