नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा घोळ अजूनही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून सात दिवस उलटले असले, तरी या मतदारसंघातून कुठल्याच पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्याने संभ्रम वाढला आहे.
दरम्यान भाजपची पहिली यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीकडे जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असली, तरी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे देखील उमेदवारीसाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत.
एकीकडे भाजपमध्ये उमेदवारी निश्चित होत नसताना दुसरीकडे राष्ट्रवादीतही उमेदवारीचा घोळ मिटलेला नाही.
राष्ट्रवादी पुन्हा अनेकांची नावे समोर येत असून, राष्ट्रवादीच्या यादीकडे ही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. येत्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट झाल्यानंतरच राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.