अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची चर्चा आहे. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आपले रूप बदलणार आहे. मनसेच्या अधिवेशनात पक्षाच्या झेंड्यात आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे.
चौरंगी असलेला ध्वज आता पूर्णपणे भगवा होणार असून त्यामध्ये शिवमुद्राही असणार असल्याचे समजते. परंतु यावर मनसेकडून अधिकृत दुजोरा दिला गेला नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती केल्याने एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले अनेक जण पक्षापासून दुरावले गेले आहेत.
परिणामी असे नाराज शिवसैनिक राज ठाकरे यांच्या आक्रमकतेकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे गेल्या काही वर्षांत कोणत्याही निवडणुकांमध्ये मनसेला भरीव कामगिरी करता आली नाही.
त्यामुळे मनसेकडून पक्षाला नवसंजीवनी देण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला, परंतु त्याला यश आले नाही. नाराज शिवसैनिकांसह जुन्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसेचे रूप बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
यासाठी राज ठाकरे येत्या काळात राज्यभर दौरा करून कार्यकर्ते तसेच सर्वसामान्यांच्या भेटी घेऊन त्यांची मते जाणून घेणार आहेत. पक्षाचा सध्याचा चौरंगी ध्वज इतिहासजमा करत पूर्णपणे भगवे रूप घेणार आहे. तसेच त्यावर पक्षाचे चिन्ह असलेल्या इंजिनाऐवजी ‘शिवमुद्रा’ असणार आहे.