अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यातील गरीब व गरजूंना दहा रुपयांमध्ये 26 जानेवारीपासून शिवभोजन थाळी मिळण्यास सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने गरीब व गरजू जनतेसाठी 10 रुपयांत शिवभोजन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरमध्ये 26 जानेवारीला सार्वजनिक 7 ठिकाणी ही शिवथाळी सुरू होणार आहे.
नगर शहरात एका दिवसांत 700 थाळ्या देण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाने तसे नियोजन केले आहे. जनतेला 10 रुपयांत थाळी देण्याचा निर्णय राज्य शासनाने 1 जानेवारीला घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत 18 हजार थाळ्या दरदिवशी द्यायच्या आहेत. त्यात नगरसाठी 700 थाळ्या मंजूर आहेत. गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी सद्यस्थितीत सुरू असणार्या भोजनालयांची निवड करून जिल्हा प्रशासनाने ही प्रक्रिया पार पाडावी असे शासन निर्णयात म्हटले आहे.
या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त व जिल्हा पुरवठा अधिकारी अशी तीन सदस्यीय समिती कार्यरत राहणार आहे. दि. 6 ते 10 जानेवारी या कालावधीत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सक्षम भोजनालयांची पाहणी करायची आहे. त्यानंतर निवड केलेल्या भोजनचालकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत.
नगर शहरात सात ते आठ ठिकाणचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यात रेल्वेस्थानक, स्वस्तिक, तारकपूर व माळीवाडा ही तिन्ही बसस्थानके, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय व तारकपूर येथील एक अशा सात ठिकाणच्या भोजनालयांची पाहणी जिल्हा पुरवठा अधिकाजयांनी केली आहे.
हे सर्व प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाजयांसमोर येणार आहेत. प्रत्येकी 100 थाळ्या या 7 भोजनालयांना देण्यात येणार आहेत. या योजनेचा प्रारंभ 26 जानेवारी रोजी करण्याच्या अनुषंगाने स्थानिक समितीने सर्व पूर्वतयारी करून घ्यावी. तसेच भोजनचालकांचे आश्वयक असलेले शासकीय-निमशासकीय यंत्रणांचे परवाने प्राप्त करून घेतल्याची खात्री केल्यानंतर त्यांना कार्यारंभ आदेश द्यावेत व ही योजना 26 जानेवारीला सुरू होईल याची दक्षणा घ्यावी, असे शासनाने 6 जानेवारी रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.