आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्डने घेतलेल्या रेडिओलॉजी विभागातील सुरभि हॉस्पिटलचे रेडिओलॉजिस्ट डॉ. संकेत सारडा यांनी सुवर्णपदक मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले. सन 2019 मध्ये झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील डीएनबी परीक्षेत सुवर्णपदक मिळवणारे ते एकमेव डॉक्टर आहेत.
आज प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीत त्यांचे अव्वलस्थान नमूद करण्यात आले आहे.डॉ. सारडा हे मूळचे हिंगोली येथील रहिवासी आहेत. त्यांनी पुण्यातील ससून हॉस्पिटल येथील बीजे मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
त्यानंतर बेंगलोर येथील किडवई कॅन्सर इन्स्टिट्यूट येथून त्यांनी रेडिओलॉजी विभागातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. गेल्या पावणेदोन वर्षांपासून ते नगर शहरातील नामांकित सुरभि हॉस्पिटल येथे रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहतात.
अल्पावधीतच त्यांचा जिल्ह्यात नावलौकिक पसरला आहे. रेडिओलॉजी विभागातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. यशाबद्दल त्यांचे टीम सुरभि व शहरासह जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिकांकडून अभिनंदन होत आहे.