अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर पंचायत समितीत सभापतिपदी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाच्या संगीता शिंदे, तर उपसभापतिपदी बाळासाहेब तोरणे यांची पाच विरुद्ध तीन मतांनी निवड झाली. ससाणे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे या विखे-मुरकुटे गटात सामील झाल्या. त्यामुळे ससाणे गटाच्या वंदना मुरकुटे यांना पराभव पत्करावा लागला.
शिंदे व वंदना मुरकुटे या दोघींनीही काँग्रेसच्या गटनेत्या असल्याचा दावा करीत पक्षाचा व्हीप बजाविला. निवडीनंतर मुरकुटे यांनी गटनेत्या असल्याने आपल्यालाच व्हीप बजाविण्याचा अधिकार असून, शिंदे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. त्यांनी पक्षांतरबंदी कायद्याचा भंग केल्याने या निवडीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी ससाणे गटाकडून वंदना मुरकुटे, तर विखे-मुरकुटे गटाकडून संगीता शिंदे यांनी प्रत्येकी दोन-दोन अर्ज दाखल केले होते. मुरकुटे यांच्या अर्जावर अरुण नाईक व विजय शिंदे, तर शिंदे यांच्या दोन्ही अर्जावर दीपक पटारे सूचक होते. उपसभापतिपदासाठी विखे-मुरकुटे गटाकडून बाळासाहेब तोरणे, तर ससाणे गटाकडून विजय शिंदे यांनी अर्ज दाखल केले होते.
तोरणे यांच्या दोन्ही अर्जावर कल्याणी कानडे, तर शिंदे यांच्या अर्जावर अरुण नाईक, वंदना मुरकुटे सूचक होते. दुपारी तीन वाजता सभेचे कामकाज सुरू झाले. अर्जांची छाननी होवून चारही अर्ज वैध ठरले. माघारीच्या मुदतीत कोणीही माघार न घेतल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले.
यात शिंदे व तोरणे यांना दीपक पटारे, कल्याणी कानडे, वैशाली मोरे व स्वत:चे एक अशी पाच जणांची मते मिळाली, तर वंदना मुरकुटे यांना स्वत:चे, अरुण नाईक व विजय शिंदे अशी तीन मते मिळाली. पाच विरुद्ध तीन मतांनी शिंदे व तोरणे यांची अनुक्रमे सभापती, उपसभापतिपदी निवड घोषित करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अनिल पवार यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार प्रशांत पाटील व गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी सहाय्य केले. दरम्यान, निवडीची प्रक्रिया सुरू असताना माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे पंचायत समितीत दाखल झाले.
विखे-मुरकुटे सभापती दालनात सुमारे तासभर थांबून होते. निवडीनंतर नूतन पदाधिकारी शिंदे व तोरणे यांचा दोघांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक पटारे, नाना शिंदे, जि. प. सदस्य शरद नवले, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, नगरसेवक मुक्तार शाह, जितेंद्र छाजेड, नानासाहेब पवार, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, संदीप शेलार, तर ससाणे गटाचे संजय फंड, सचिन गुजर, राजेंद्र पाऊलबुद्धे, सुधीर नवले, संजय छल्लारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता माझ्या विरोधासाठी मी श्रीरामपुरात आणला !
माझा तालुका कोणी दत्तक घ्यावा, यासाठी ही प्रक्रिया केली आहे का प्रश्न पडतो. सक्षम स्त्रीयांना पाठिंबा देवून नंतर माघार घ्यायला लावायची अशा पुरुषी समाजावर मी वार करते. वैयक्तिक द्वेषातून तुम्ही श्रीरामपूर तालुक्याला कसे वेठीस धरू शकता, हा प्रश्न पडतो.
‘जो हुआ वो भला, जो ना हुआ वो उसेभी भला’, असे यासाठी हरिवंशराय बच्चन यांच्या दोन ओळी सांगत वंदना मुरकुटे म्हणाल्या, मी स्वत:ला इतकी भाग्यवान समजते की, महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता माझ्या विरोधासाठी मी श्रीरामपुरात आणला. तसेच गटनेता म्हणून मी व्हीप बजाविला आहे. संगीता शिंदे यांनी पक्षविरोधात जावून काम केले असल्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल करणार आहे.