अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येमुळे आखातात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
या चर्चेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नववर्षाची शुभेच्छा देत परस्पर महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याची इच्छा व्यक्त केली.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांना नववर्षाची शुभेच्छा दिली.
तसेच ट्रम्प यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व अमेरिकन नागरिकांनाही नववर्षात चांगले आरोग्य, समृद्धी व यश लाभण्याची कामना व्यक्त केली.
मोदींनी यावेळी गत काही वर्षांतील उभय देशांतील संबंधांच्या यशावर आनंद व्यक्त करत द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी ट्रम्प यांच्यासोबत मिळून काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.
दुसरीकडे, व्हाईट हाऊसनेही एका निवेदनाद्वारे या चर्चेची पुष्टी केली आहे. ‘ट्रम्प यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोमवारी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली.
या चर्चेत दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिकेतील रणनीतिक संबंधांना २०२० मध्ये अधिक मजबूत करण्याच्या पद्धतीवर चर्चा करून प्रादेशिक सुरक्षेचा आढावा घेतला’, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.