अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर पंचायत समितीत मंगळवारी (दि. ७) सभापती व उपसभापती यांची निवड पार पडली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील किमान समान कार्यक्रमाचा शब्द न पाळल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी ना. थोरातांच्याच विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.
दुसरीकडे काँग्रेस गटाचे सभापती व उपसभापती झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करीत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी शिवसैनिक व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण पंचायत समिती दुमदुमून गेली होती.
राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्हा परिषद व पंचायत समितीही एकत्रित लढविण्याचे तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आदेश दिले होते.
त्या आदेशानुसार संगमनेर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे पंचायत समितीतील विद्यमान सदस्य असणारे अशोक सातपुते यांना उपसभापतिपदाची संधी मिळणार असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी ना. थोरात यांच्याशी चर्चा केली.
तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर हेही सातपुते यांना उपसभापती करण्यासाठी प्रयत्न करीत होते. निवडीच्यावेळी पंचायत समितीत सकाळपासूनच शिवसैनिकांनी गर्दी केली होती. मात्र, सभापती व उपसभापती हे दोन्ही काँग्रेसचे होणार असल्याचे मेसेज व्हॉटस्ॲपवर आले.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती यांची निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये ना. थोरात यांच्या गटाच्या सभापती व उपसभापती यांची निवड करण्यात आल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले.
शिवसैनिकांनी एकत्र येत महाविकास आघाडीचा धर्म न पाळणाऱ्या ना. थोरात यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिकांनी निषेधही व्यक्त केला आहे. दुसरीकडे सभापतिपदी सुनंदा जोर्वेकर व उपसभापतिपदी नवनाथ अरगडे यांच्या निवडीबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘ना. बाळासाहेब थोरात यांचा विजय असो’ अशी घोषणाबाजी केली.
यानिमित्ताने राज्यात महाविकास आघाडीत प्रमुख भूमिका बजाविणाऱ्या ना. थोरात यांच्याच संगमनेर तालुक्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे पहावयास मिळाले आहे. महाविकास आघाडीचा धर्म न पाळल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.