ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट

Ahmednagarlive24 office
Published:

गावरान आणि देशी बियाणे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘कोंभाळणे’ येथील बीजबँकेला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी भेट दिली. यावेळी स्वत: राहीबाई पोपेरे यांनी ज‍िल्हाध‍िकाऱ्यांना बीज बँक प्रकल्प व त्यांच्या एकूण कामकाजाव‍िषयी माह‍िती द‍िली. “राहीबाईंशी झालेला आस्थेवाईक संवाद व स्नेहपूर्ण भेट कायमच स्मरणात राहील ” अशी भावना ज‍िल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

‘बायफ’ या संस्थेच्या माध्यमातून पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या गावरान आणि देशी बियाणे संवर्धनाचे काम देशातील कानाकोपऱ्यात पोहचले आहे. या संस्थेच्या प्रयत्नाने व राज्यशासनाच्या मदतीने देशातील ग्रामीण भागातील पह‍िली बीज बँक कोंभाळणे (ता.अकोले) येथे उभारण्यात आली आहे.

“बीज बँकेला एक द‍िवस आपण नक्कीच भेट देण्यास येऊ” असा शब्द ज‍िल्हाध‍िकाऱ्यांनी राहीबाईंना द‍िला होता. बीज बँकेला भेट देऊन त्यांनी तेथे सुरू असलेले उपक्रम समजावून घेतले. स्थानिक वाणांचे संवर्धन व वृद्धि यासंदर्भातील सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांनी राहीबाई यांच्याकडून समजून घेतली.

बीज बँकेत लावलेले फोटो व अवॉर्ड गॅलरी बघताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतर महत्वाच्या व्यक्तींसोबत असलेले फोटो बघून ज‍िल्हाध‍िकाऱ्यांनी राहीबाईंना व‍िचारणा केली की, ” आपण यांच्यासोबत पुरस्कार घेतल्यानंतर संवाद साधला का ?” त्यावर राहीबाई यांनी पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्यासोबत मराठीत झालेला संवाद व आठवणींना उजाळा दिला.

ग्रामीण भागातील प्रमुख समस्या वीज , रस्ते व पाणी यांच्यावर लक्ष घालण्याची विनंती राहीबाईंनी ज‍िल्हाध‍िकाऱ्यांना यावेळी केली. पोपेरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा दुरुस्त करण्याचे काम ‘अग्निपंख’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण सोहळ्यासाठी ‘ नक्की या..’ असे निमंत्रणही राहीबाईंनी ज‍िल्हाध‍िकाऱ्यांना दिले.

राहीबाई यांच्याशी मुक्त संवाद साधतांना त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांनी जाणून घेतले. स्थानिक बियाणे संवर्धनासाठी राहीबाई यांचे असलेले योगदान समजून घेतले. राहीबाईंशी ही भेट कायम स्मरणात राहील. अशी प्रतिक्रिया ज‍िल्हाध‍िकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

यावेळी राहीबाईंची पती सोमा पोपेरे, संगमनेरचे उपव‍िभागीय अध‍िकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अकोलेचे तहसीलदार सतीश थेटे, मंडलाध‍िकारी बाबासाहेब दातखिळे, तलाठी श्री. खेमनर उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe