अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरात आज राजकीय भूकंप झाला आहे,महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीसह शिवसेना आणि भाजपाच्या गटनेत्यांनी बंद पाकीटाद्वारे सुचविलेली पाचही नावे जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरविली आहेत.
शिवसेनेकडून संग्राम शेळके, मदन आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबा गाडळकर, विपुल शेटिया आणि भारतीय जनता पक्षाकडून रामसदार आंधळे यांची नावे सादर करण्यात आली होती.

ही नावेच महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्वीवेदी यांनी रद्द केल्याने सर्वच पाचही भावी नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांचा चांगलाच हिरमोड झालाय. विहीत नमून्यात आणि अटी पूर्ण झालेल्या नसल्याचे कारण देत जिल्हाधिकार्यांनी ही नावे रद्द केल्याची माहिती आहे.
महापालिकेची विशेष सभा सुरू होताच, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या पाचही नगरसेवकांना अपात्र ठरविले. स्वीकृत नगरसेवकांच्या अटी पूर्ण न केल्यांने अपात्र ठरविण्यात आल्याचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय पक्षांचा आणि त्यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या स्वीकृतांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. अपात्रेची घोषणा होताच, महापालिकेत चर्चा रंगली होती. या घोषणेमुळे स्वीकृतांच्या मागे सुरू असलेल्या घोडेबाजार उधळला गेला असल्याची खमंग चर्चा महापालिकेत रंगली होती.