अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- घरकुल मंजूर झाले असून, त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील, असे सांगून दोन महिलांकडील सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तोफखाना भागातील भराडगल्ली व बोल्हेगाव भागात शनिवारी दुपारी या घटना घडल्या आहेत. विडी कामगार असलेल्या सुनीता लक्ष्मण रच्चा शनिवारी दुपारी एकच्या सुमारास आपल्या घरात होत्या. त्या वेळी निळा रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती त्यांची घरी आला.
तुम्हाला महानगरपालिकेचे घरकूल मंजूर झाले असून, अडीच लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी पैसे भरावे लागतील, असे म्हणून त्यांच्या गळ्यातीत सोन्याची पोत काढून घेतली.
त्या वेळी रच्चा यांना काही समजले नाही. काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस स्टेशनला येऊन झालेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर काही वेळाने बोल्हेगाव भागातील कृष्णाबाई वसंत चव्हाण या ही तोफखाना पोलिस स्टेशनला आल्या.
घरकुल मंजूर झाल्याच्या नावाखाली त्यांचा सोन्याचा पोत नेऊन फसवणूक झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दुसरी घटना शनिवारीच दुपारी दोनच्या सुमारास घडली.
दोन्ही महिलांनी फसविणाऱ्या व्यक्तीचे सांगितलेले वर्णन एकसारखेच आहे. रच्चा यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.