अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : नगर जिल्हा बँकेच्या येथील दोन शाखांमधील सोने तारण घोटाळा प्रकरणात गेल्या आठ महिन्यापासून फरार असलेल्या दोघा सराफांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने दि. १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दोघांनी दिलेल्या जबाबामुळे आता सात खासगी सावकारांची चौकशी होणार आहे.
पोलिसांनी नगर जिल्हा सहकारी बँकेच्या शहर शाखेतील गोल्ड व्हॅल्युअर रामेश्वर उर्फ राजन कचरू माळवे व शिवाजी रस्ता शाखेचे गोल्ड व्हॅल्युअर अशोक कचरू माळवे (रा.लोणार गल्ली, श्रीरामपूर) या दोघांना अटक केली. बनावट सोन्याचे दागिने तारण ठेऊन त्यांनी काही लोकांच्या नावावर सुमारे ३४ लाख ५९ हजार रुपयांचे कर्ज काढले होते.
याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी विलास कसबे (रा. शिरसगाव) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली होती. अशाचप्रकारे आणखी दोन राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा व काही पतसंस्था मिळून एक कोटीपेक्षा जास्त रक्कमेचा हा घोटाळा आहे.नगर जिल्हा सहकारी बँकेच्या दोन शाखांमध्ये २२ जणांना सोने तारण कर्ज दिले. कर्ज थकल्याने बँकेने त्यांच्याविरुद्ध जपतीची कारवाई सुरू केली. त्यानंतर काहीजणांनी कर्जाची रक्कम भरली.
ज्यांनी रक्कम भरली नाही, त्यांना नोटिसा काढण्यात आल्या. सोन्याचा जाहीर लिलाव करण्यात आला. मात्र, हे सोने बनावट निघाले. तसेच दोघा सोनारांनी तारण ठेवलेले सोने व लिलावाच्या वेळी दाखविलेले सोने यात मोठी तफावत आढळून आली. कर्जदार व गोल्ड व्हॅल्युअर यांनी संगनमत करून बनावट सोन्याचे दागिने बँकेत ठेवून त्यास खरे व जास्त वजनाचे दाखवून मोठी रक्कम उचलली.
या प्रकरणी दोघा सोनारांसह २२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.बनावट सोने कर्ज प्रकरणातील कर्जदारांनी आमचा सोने तारण घोटाळ्याशी संबंध नाही. आमची फसवणूक झाली, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. तसेच सहकार खात्याच्या नाशिक येथील सहनिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदविली होती.
याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. २२४ खातेदार या प्रकरणात अडकलेले आहेत. आता पोलिसांनी दोघा मुख्य सुत्रधारांना अटक केल्याने या घोटाळ्यातील खरे आरोपी पुढे येण्याची शक्यता आहे. अद्यापही कांचन माळवे, अभिषेक माळवे, पल्लवी माळवे, संपत सावळेराम हे फरार आहेत.
राजन माळवे व अशोक माळवे या दोन्ही आरोपींनी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्यापुढे हजर होऊन आपबिती कथन केली. व्यावसायात खासगी सावकारांकडून कर्ज घेतले. एका सावकाराला एक कोटीचे व्याज दिले. चक्रवाढ पद्धतीने सुमारे महिन्याला दहा ते पंधरा टक्के व्याजदराने पैसे दिले. सात सावकारांच्या जाचातून सुटण्याकरिता हा घोटाळा केला. त्यात काही राजकीय पक्षाचे पुढारीही सहभागी आहेत.
असा कबुली जबाब पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे आता या खासगी सावकारांची चौकशी होणार आहे. सोने घोटाळ्यातील पैसा हा माळवे यांच्याकडे नसून तो खासगी सावकारांकडे गेला आहे. हा पैसा वसूल करणे हे पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे.
दरम्यान, सावकरांचे कर्ज फेडण्यासाठी हे पैसे वापरले या व्यतिरिक्त आणखी माहिती पोलीस तपासात पुढे आलेली नसल्याने दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून वाढीव कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील यांनी सांगितले.