अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातील ‘कराची’तच आहे. तेथूनच तो गुन्हेगारी कारवाया हाताळत असल्याची धक्कादायक कबुली मुंबई पोलिसांनी अटक केलेला गँगस्टर एजाज लकडावाला याने दिली आहे.
लकडावालाने पोलिसांना दाऊदचा ठावठिकाणा सांगितल्याने त्याच्या जीवाला आर्थर रोड तुरुंगात धोका असल्याचेही समोर आले आहे. एका इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील खुलासा केला आहे.
त्यानुसार दाऊद इब्राहिम राहत असलेल्या दोन निवासस्थानांची माहितीही लकडावाला याने मुंबई पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिली आहे. स्वत:ची टोळी निर्माण करण्यापूर्वी लकडावाला हा दाऊदसाठी काम करीत होता.
एजाज लकडावाला सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून चौकशीदरम्यान त्याने दाऊद टोळीबाबत महत्त्वाचा तपशील पोलिसांना सांगितला. लकडावालाच्या दाव्यानुसार कराचीत दाऊदची दोन घरे आहेत. कराचीतील डीफेन्स हाउसिंग भागात त्यातील एक घर आहे तर दुसरे घर क्लिफ्टन भागात आहे. या दोन्ही घरांचे संपूर्ण पत्तेही लकडावालाने दिले आहेत.
तपास अधिकाऱ्याच्या हवाल्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने दाऊदला विदेशात जाण्यासाठी बनावट पासपोर्ट मिळवून देण्यात मदत केल्याचा गौप्यस्फोटही लकडावालाने केला आहे.
दाऊदसह त्याचा भाऊ अनीस इब्राहिम आणि दाऊदचा राइट हँड छोटा शकीलकडेही बनावट पासपोर्ट आहे आणि आयएसआयच्या मदतीने त्यांनी हे पासपोर्ट मिळवलेत, अशी माहिती लकडावालाने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.