अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : चोरीचे दागिने चोरल्यानंतर ते विकून प्लास्टिक सर्जरी करण्याच्या तयारीत असलेल्या एका चोराच्या मुसक्या दिंडोशी पोलिसांनी आवळल्या आहेत. समीर मुकर्रम शेख ऊर्फ चिरा असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी गोरेगाव पश्चिमेतील एस. व्ही. रोड परिसरातून सरिता मोरे या महिला रिक्षाने प्रवास करत होत्या. ओबेरॉय मॉलजवळील सिग्नलवर रिक्षा थांबली असता, दुचाकीवरून आलेल्या समीरने सरिता यांची बॅग हिसकावत तेथून पळ काढला.
या प्रकरणी सरिता यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासात चोराच्या दुचाकीस्वाराचा माग काढला. त्यानंतर खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी मालाड मालवणीतून समीर चिराला अटक केली.
तसेच त्याच्या जवळील १७ तोळे सोन्यापैकी १४ तोळे सोने जप्त केले. उर्वरित सोने साथीदार घेऊन गेल्याची माहिती समीरने पोलिसांना दिली. वर्षभरापूर्वी झालेल्या मारामारीदरम्यान, आरोपी समीर शेखच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार झाला होता.
त्याच्या खुणा चेहऱ्यावर पडल्याने त्याला समीर चिरा असेच नाव पडले होते. तसेच त्याची याच नावाने हेटाळणी व्हायची.
त्याशिवाय छोट्या-मोठ्या गुन्ह्यांमुळे पोलिसांची त्याच्यावर सतत नजर असायची, त्यामुळे त्याने प्लास्टिक सर्जरी करण्याचे ठरवले होते.