अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : शहरातील बेलापूर रस्त्यावर लोकसहभागातून उभारलेल्या वेससाठी पुढाकार घेणाऱ्या मंडळाला विश्वासात घेऊन नामकरण करण्याचा निर्णय घेण्याची मागणी विरोधी गटाकडून झाली. मात्र, नामकरणाला विरोध असल्याचा समज सत्ताधारी गटाचा झाल्याने यावेळी जोरदार खडाजंगी झाली.
त्यानंतर याविषयी आलेल्या अर्जावर पालिकेची टिप्पणी वाचण्यात येवून यामागील वस्तूस्थिती समोर आल्यानंतर सर्वानुमते छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. प्रभारी मुख्याधिकारी प्रकाश जाधव, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. सत्ताधारी गटातील प्रमुख नगरसेवकांची सभेला गैरहजरी होती.
स्वच्छता अभियानांतर्गत पालिकेला मिळालेल्या १६ घंटागाड्यांना जुनी टायर वापरण्यात आल्याचे नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी निदर्शनास आणून दिले असता नगराध्यक्षांनीही आपलीही याविषयी तक्रार असल्याचे स्पष्ट करत संबंधित अधिकाऱ्याकडून खुलासा मागत दुरुस्तीच्या सूचना केल्या.
सभेच्या शुटिंगचे दर, फ्लेक्स बोर्ड पेस्टिंगचे दर याविषयात उपनगराध्यक्ष ससाणे, नगरसेविका भारती कांबळे, बिहाणी यांनी भाग घेतला.