अहमदनगर लाईव्ह 24 टीम / भंडारदरा : आई घोरपडा मातेच्या आशीर्वादाने आणि माझ्या आदिवासी जनतेच्या दिलेल्या प्रेमानेच मी अकोले तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. म्हणूनच आज अकोले तालुक्यातील प्रत्येक माझा माणूस आमदार आहे.
मी माझ्या जनतेशी गद्दारी करणार नसून त्यांना योग्य तो न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. जनतेच्या विश्वासाला कोठेही तडा जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी रंधा धबधबा येथे आयोजित संक्रांत मेळाव्यात काढले.
अकोले तालुक्यातील अकोले तालुका आदिवासी समाज जाणीव जागृती संघर्ष समितीच्या वतीने मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विधानसभेच्या निवडणुकीत बदल घडवून आणणारे भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, आमदार लहामटे, तसेच ज्येष्ठ नागरिक विठ्ठल बापू खाडे यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यात बोलताना आमदार लहामटे यांनी अकोले तालुक्याच्या माजी मंर्त्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. आदिवासी समाजात घुसखोरी ही माजी आदिवासी मंर्त्यांच्याच कालावधीत झाल्याचे ते बोलले. मी आई घोरपडा मातेच्या आशीर्वादाने आणि माझ्या जनतेच्या जोरावर आमदार झालो आहे.
माझ्या तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणून पाण्यावर अगोदर आमचा हक्क आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात अगोदर पाणी खेळले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणारच, असे ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत अकोले तालुक्यात एमआयडीसी आणणारच, असा शब्द त्यांनी याप्रसंगी जमलेल्या जनसमुदायाला दिला.तालुक्यातील जनतेने ठरवलं तर काय होतं याचा प्रत्यय गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे.
आदिवासी बांधवांच्या प्रत्येक कार्यक्रमास मोठ्या जनसमुदायाने उपस्थिती लावा, तरच माझ्या आदिवासी बांधवापर्यंत आपले विचार पोहचतील व आमचा आदिवासी सदृढ होईल. आदिवासी समाज जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत या समाजात प्रगती होणार नाही. तुम्ही आम्हाला निवडून दिले आहेत त्याचे उपकार आम्हाला फेडायचे आहेत, असे उद्गार सत्कारमूर्ती अशोक भांगरे यांनी काढले.