अहमदनगर लाईव्ह 24 टीम : इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे, त्यामुळे वादावर पडदा पडला आहे, पण भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत. आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
इंदिरा गांधी यांनी १९७५ सालामध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम केले. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले.
ज्या करीमलालाबद्दल बोललं जातंय त्याच्यासकट हाजी मस्तान, युसूफ पटेलसारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत.
आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादवसारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणाऱ्या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारीबाबत बोलू नये, असा टोलाही थोरात यांनी लगावला आहे.