कर्जत :- जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके यांना मंगळवारी स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाने स्पेशल सेल वॉरंटप्रकरणी अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, राशिन येथील जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके यांची जगंदबा कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स प्रमोटर्स या नावाने पुणे येथे बांधकाम क्षेत्रात काम करणारी संस्था होती.
२०१२ साली या संस्थेच्या माध्यमातून पुणे येथील मांगलेवाडी परिसरात घोडके यांनी ओनरशिप फ्लॅटची एक स्कीम तयार केली. यात अनेकांना फ्लॅट देतो असे सांगितले.
यासाठी पैसे घेतले आहेत. यात राशिन परिसरातील अनेकांनी फ्लॅटसाठी मोठी रक्कम दिली होती.
मात्र, यापैकी कोणालाच फ्लॅट मिळाला नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत. तगादा लावल्यानंतर घोडके यांनी प्रत्येकाला चेक दिले.
मात्र, खात्यावर पैसे नसल्याने चेक वटले नाहीत. त्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर कर्जत न्यायालयात खटला भरला आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने त्यांना अटक करून कर्जत येथील न्यायालयात हजर केले.
रक्कम भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.