अहमदनगर : नगर जिल्ह्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहणारे शिवाजी कर्डिले लोकसभा निवडणुकीत कुणाला मदत करणार याविषयी चर्चा होती. पण सुजय विखेंच्याच मागे राहणार असल्याचं शिवाजी कर्डिलेंनी स्पष्ट केलं आहे.
नगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आ.संग्राम जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत.
“भाजपने सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत सुजयचाच विक्रमी मताने विजय होईल. असे आ.कर्डिले यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना सांगितले.
यावेळी आ. शिवाजी कर्डिलेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर असणारा रागही व्यक्त केला. 2009 च्या निवडणुकीत मला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. पण राष्ट्रवादीच्याच लोकांनी मला पाडलं. राष्ट्रवादीने माझी राजकीय कारकीर्द संपवली होती.
पण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला राहुरीतून विधानसभेसाठी तिकीट दिलं आणि पुन्हा राजकीय पुनर्वसन केलं. त्यामुळे संकटाच्या काळात मागे उभा राहिलेल्या भाजपशी दगाफटका करणार नाही, असं कर्डिलेंनी स्पष्ट केलं.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आहे आणि मला विश्वासात घेऊन उमेदवारी दिली. वेगळं काहीही घडणार नाही, एकच घडेल की सुजय विखेंचा विक्रमी मतांनी विजय होईल”, असंही कर्डिले म्हणाले.