अहमदनगर लाईव्ह 24 टीम : राज्यातील निवडणूक पार पडल्यानंतर पुढील विरोधी पक्षनेता होईन, असे मला वाटले होते. परंतु, अचानक अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.
राज्यात सरकार स्थापन करताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे मन वळवणे सोपे काम नव्हते. शेवटी पक्षाच्या विचारधारेचा प्रश्न होता, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेच्या वतीने आयोजित स्वर्गीय रावसाहेब शिंदे स्मृतिदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदानप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले, सत्तास्थापनेप्रसंगी कालावधी आणि त्यानंतरचे तीन महिन्यांचे सरकार यावर एखादा चित्रपट निघू शकतो अथवा पुस्तक लिखाण होऊ शकते. या काळात मुंबईत प्रसारमाध्यमे आमच्या मागावर होती.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना रुग्णालयात भेटण्यासाठी गेल्यावरही माध्यमे त्या ठिकाणी पोहोचली. बहुमत दाखवण्यासाठी १७० आमदार आम्ही हॉटेलमध्ये दाखवले, परंतु आमच्यासमोर ५०० कॅमेऱ्यांची भिंत उभी होती आणि त्याद्वारे राष्ट्रीय पातळीवर मोठी दखल घेतली गेली.
सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत आहोत. राज्य चालवताना राज्यघटनेसोबत कधी तोडजोड होऊ शकत नाही. चुकीचे काम करणाऱ्यांना मतदारांनी जाब विचारला पाहिजे. माझे मामा रावसाहेब शिंदे आणि त्यांचे भाऊ अण्णासाहेब शिंदे यांचा माझ्या जीवनावर प्रभाव आहे.
त्या काळी अण्णासाहेब राजकारणात आले असले तरी रावसाहेबांनी राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, खासदार श्रीनिवास पाटील, ग्रंथालय चळवळीचे प्रशांत गडाख, साहित्यिक मिलिंद जोशी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विचारवंत संदीप वासलेकर, मधुकर भावे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, मोहन जोशी, रमेश बागवे, उद्धव कानडे, सचिन इटकर, सुनील महाजन उपस्थित होते.