अहमदनगर : भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली.
नगर दक्षिणमधून भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने, विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी नाराज झाले आहेत.
त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी काल काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील गेले होते. त्यानंतर आज स्वत: सुजय विखे पाटील यांनी दिलीप गांधींची भेट घेतली.
डॉ. सुजय विखे पाटील आणि दिलीप गांधी यांच्यात जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. सदिच्छा भेट असल्याचे सुजय विखे पाटलांनी या भेटीनंतर सांगितले असले, तरी दिलीप गांधींची नाराजी दूर करण्यात विखे पाटील पिता-पुत्राला यश आल्याची चर्चा आहे.
दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी नगर दक्षिणमधून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.
मात्र, आधी राधाकृष्ण विखे पाटील आणि आता सुजय विखे पाटील यांच्या भेटीगाठीनंतर सुवेंद्र गांधी आपली घोषणा मागे घेण्याची शक्यता असून,
ते तलवार म्यान करण्याच्या तयारीत आहेत, अशीही चर्चा आहे. शिवाय, दिलीप गांधी हे सुजय विखेंचा प्रचार करताना दिसू शकतात.