Ahmednagar News:कर्जत तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या गटाला गावातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना भाजपाचे माजीमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी झटका दिला असल्याची राजकीय चर्चा आहे.

कर्जत तालुक्यातील तिन ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले असून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या गटाला गावातच पराभव स्वीकारावा लागला असून राज्यात सत्तांतर होताच कर्जत तालुक्यात परिवर्तनाचे वारे या निवडणुकीपासून सुरू झाले असल्याची चर्चा आहे.
कोरेगाव ग्राम पंचायतमध्ये जनशक्तीने धनशक्तीचा पराभव केला असून, सर्वसामान्य नागरिकांनी विकास व त्या भोवती चाललेल्या दिखाव्याला जागा दाखवून देत वास्तव समोर आणले आहे.
कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम झाला होता. यापैकी कुळधरण ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास पदाधिकाऱ्यांना यश आले होते.
यामध्ये भाजपाने ७ तर राष्ट्रवादीने ६ सदस्य बिनविरोध केले. या सोबत गुरुवार दि ४ रोजी उर्वरीत कोरेगाव आणि बजरंगवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.
शुक्रवारी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यामध्ये कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये १३ जागेपैकी ७ जागेवर माजी सरपंच भाजपाचे बापूराव शेळके व माजी सभापती पुष्पा शेळके यांच्या नेतृत्वाखालील गटाने ७ जागा जिंकून पारंपरिक विरोधक फाळके गटाला आस्मान दाखवले.
कोरेगाव ही महत्वाची ग्रामपंचायत असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे हे गाव आहे. तर पंचायत समितीच्या सभापती मनीषा जाधव यांचेही गाव आहे.