Maharashtra News:विरोधक आणि त्यांचे नातवाईकांवर इडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप नेहमीच होतो. त्या तुलनेत सत्ताधारी गटाचे लोक सुरक्षित मानले जातात.
मात्र, ठाण्यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतण्यालाच अटक झाली आहे. तीही इडीकडून नव्हे तर शिंदे यांच्याच नियंत्रणाखालील मुंबई पोलिसांनी केली आहे.

अर्थात कारणही तसेच आहे. शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याला जुगार खेळत असताना अटक करण्यात आली आहे. सुरवातीला चौकशी करून सर्वांना सोडून देण्यात आले होते.
मात्र, याची चर्चा सुरू झाल्याने पोलिसांनी सर्वांना पुन्हा अटक केली. मीरारोडच्या जीसीसी क्लबमधील एका खोलीत महेश शिंदे जुगार खेळत होता. त्यावेळी पोलिसांनी क्लबवर छापा टाकून महेश शिंदेसह १० जणांना अटक केली.
नेमका आजच मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना ही लाजीरवाणी गोष्ट समोर आली आहे. मीरारोडमधील जीसीसी क्लब या हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या जुगार खेळला जात असल्याची माहिती मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक अविराज कुरहाडे यांनी या हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलमधील ७९४ क्रमांकाच्या रूममध्ये १० जण जुगार खेळत होते.
त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याचाही समावेश होता. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना चौकशी करून सोडण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, याची चर्चा सुरू झाल्याने शेवटी रात्री उशिरा पोलिसांनी महेश शिंदेसह सर्व जुगार खेळणाऱ्यांना अटक केली.