अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ मुंबई : राज्यातील व्यापारी यापुढे कोणाच्याही बंद आवाहनाला प्रतिसाद देऊन व्यवसाय, धंदे बंद करणार नाहीत, अशी घोषणा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स या व्यापाऱ्यांच्या संघटनेने केली आहे. वारंवार होणारे बंद आणि आंदोलनामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत या व्यापारी संघटनेने बंद न पाळण्याचा ठराव मांडला आहे.
प्रसंगी दंडावर काळ्या फिती बांधून पाठिंबा देऊ, पण दुकान बंद करणार नाही. आमचे दुकान चालू असताना अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सरकारने संरक्षण द्यावे.
जेणेकरून आम्हाला दुकाने चालू ठेवता येतील, काही तोडफोड, अनुचित प्रकार घडल्यास पूर्णत: शासनाला जबाबदार धरले जाईल. कृपया आपल्या मार्गदर्शनाची व सहकार्याची अपेक्षा, असा ठराव महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने मांडला आहे.
या ठरावानुसार आगामी काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला व्यापारी पाठिंबा देणार नसल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली आहे.