अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी : चालूवर्षी पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध आहे. तसेच मुळा धरणातून डाव्या व उजव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आलेले आहे.
अशा परिस्थितीत रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्याकरिता विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना ना. प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.ना. तनपुरे यांनी राहुरी, अहमदनगर, पाथर्डी तालुक्यातील महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अतिथीगृहावर घेतली.
याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीत तालुक्यातील विविध भागात सध्या विजेसंदर्भातील अडीअडचणीची माहिती जाणून घेतली. वीज वितरणकडून ग्राहकांना विशेषत: शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने तनपुरे यांनी विद्युत वितरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
तीनही तालुक्यात नादुरुस्त असलेले रोहित्र तात्काळ दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना केल्या. तीनही तालुक्यात आवश्यक असलेल्या नवीन विद्युत रोहित्रांची संख्या निर्धारित करून त्याबाबत वाढीव मागणी करण्यात यावी. नवीन ट्रान्सफार्मर देण्याबाबत योग्य तो निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल.
मात्र, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची अडवणूक, पिळवणूक सहन केली जाणार नाही, असा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिला.नगर तालुक्यातील जेऊर येथे १०० एचपीचा नवीन रोहित्र तात्काळ बसविण्याबाबत ना. तनपुरे यांनी आदेश दिले.
सध्या रब्बी हंगामात उभ्या पिकांना पाणी देण्याची अत्यंत गरज असल्याने भारनियमनाचे वेळापत्रक सुधारित करून पूर्णदाबाने वीज पुरवठा होण्याकरिता विशेष लक्ष सर्व अधिकाऱ्यांनी द्यावे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. गावातील लाईनमन पूर्णवेळ शेतकऱ्यांना सुविधा देईल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. तसेच थोड्याच दिवसात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.