अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेत एप्रिल ते मे २०१९ या सुट्यांच्या काळात कोट्यवधी रुपयांचा गफला झाला आहे.
विशेष म्हणजे या दोन महिन्यांत प्राथमिक शाळांना सुट्या असतांना प्राथमिक शिक्षक विभागाने अंडी, दूध आणि फळांच्या पुरवठ्यापोटी २ कोटी ५२ लाख ४४ हजारांचा निधी संबंधीत पुरवठादाराला अदा केल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे.
यासह दर महिन्याला नियमित पुरवठा होणाऱ्या तांदळाचे २ कोटी ५७ हजार रुपयांचे देयक शिक्षण विभागाने खात्री न करता परस्पर अदा केले असल्याने यात देखील मोठा आर्थिक गोंधळ असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना सदस्य जालिंदर वाकचौरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून घेतलेल्या माहितीनूसार जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत प्राथमिक शाळांना सुटी असते.
याच काळात शिक्षण विभागाने पोषण आहार पुरवठा करणाऱ्या संबंधीत ठेकेदाराशी संगमत करून पोषण आहार योजनेतील विद्यार्थ्यांच्या आहारावर ताव मारण्याचे काम केलेले आहे.
सरकारने उदात्त हेतून प्राथमिक शाळेत येणाऱ्या १ ली ते ५ वी आणि ६ वी ते ८ वीपर्यंत सरकारी आणि अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना पूरक आणि पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला. मात्र, योजना राबवितांना पुरवठादार आणि शिक्षण विभागाने ताव मारल्याचे दिसत आहे.