अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीस आपल्या प्रिय मित्राचा विमा उतरवण्याची इच्छा झाल्यास आता त्याला त्याची ही इच्छा पूर्ण करता येणार आहे. ‘विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा’ने (इरडा) अशा प्रकारच्या उत्पादनांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुटुंबीयांसमवेत मित्रांनाही विमा संरक्षित करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
खाजगी विमा क्षेत्रातील रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स, मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स आणि कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स या कंपन्यांनी इशा प्रकारच्या विम्याचा प्रस्ताव इरडा संस्थे समोर ठेवला होता. त्यास इरडा संस्थेने नुकतीच मान्यता दिली आहे. ‘फ्रेंड इन्शुरन्स’ नामक उत्पादन येत्या १ फेब्रुवारीपासून सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर सादर करण्यात येणार आहे.
या विमा उत्पादनात ५ ते ३० लोकांचा समावेश करता येऊ शकणार आहे. या पॉलिसीअंतर्गत व्यवहारांच्या आधारावर समूहाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या विम्यात डॉक्टरांशी संपर्क करणे, आरोग्यतपासणी आदींचा समावेश असणार आहे. रेलिगेअर इन्शुरन्सने दिलेल्या माहितीनुसार वर्षभरात समूहापैकी कुणीही विम्याचा दावा केला नसल्यास पुढील प्रीमियममध्ये १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
त्याचवेळी मॅक्स बुपाने चांगल्या मूल्यमापनाच्या आधारावर ५ ते १० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारची पॉलिसीची रचना जर्मनीसारख्या युरोपीय देशात उपलब्ध आहे.
आपल्या देशात ही पॉलिसी आणताना त्यात काही बदल करण्यात आले आहेत. असे बदल करताना सुरुवातीला इरडाने काही बंधने घातली होती. केवळ विमा पॉलिसी काढायची म्हणून ही गटपॉलिसी काढता येणार नाही, असे त्यावेळी इरडाने म्हटले होते.