अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत येथे एमआयडीसी उभारण्यास तत्वत: मान्यता देण्यात आल्याचे उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी गुरूवारी सांगितले. मुंबईत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ३८५ व्या बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार रोहित पवार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय काटकर उपस्थित होते.
कर्जत येथील एमआयडीसी उभारण्यासाठी उपलब्ध जागेची पाहणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आमदार पवार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री अनिल देसाई आणि राज्यमंत्री तटकरे यांची भेट घेऊन कर्जतच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती.
मंत्री देसाई यांनी सकारात्मक भूमिका घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. कर्जतच्या एमआयडीसीसाठी जागेचे सर्व्हेक्षण करण्यासाठीही त्यांनी मंजुरी दिली. या एमआयडीसीचा फायदा जामखेड तालुक्यालाही होणार आहे.
जामखेड तालुक्यात पाणी आणि उपलब्ध जमिनीचे सर्वेक्षण करुन तेथेही मध्यम स्वरुपाच्या एमआयडीसीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
सर्वेक्षणानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने पुढील काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कर्जत-जामखेडसारख्या अवर्षणप्रवण भागात एमआयडीसी होणार असल्यामुळे इथल्या लोकांकडूनही या घोषणेचे स्वागत करण्यात येत आहे.
मागील सरकारमध्ये या मतदासंघाच्या वाट्याला मंत्री व पालकमंत्रिपद येऊनही त्यांना हा प्रश्न मार्गी लावता आला नाही. मात्र, निवडणुकीपूर्वी ‘एमआयडीसी’च्या दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करुन दाखवण्याची किमया आमदार रोहित पवार यांनी अवघ्या तीन महिन्यांतच केली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com