अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मधील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रभागात १३ हजार ६२१ मतदार असून त्यापैकी किती जण मतदानाचा हक्क बजावतात, याची राजकीय पक्षांना उत्सुकता आहे. १६ मतदान केंद्रांवर हे मतदान होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
महापालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मध्ये ४ पैकी ३ जागेवर भाजपचे, तर एका जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. ६ अ ही जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असून या ठिकाणाहून शिवसेनेच्या सारिका भुतकर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने नगरसेवकपद रद्द करण्यात आले.
त्यामुळेच या जागेसाठी गुरुवारी पोटनिवडणूक होत आहे.पण आता ही रिक्त जागा कायम राखण्याचे आव्हान शहर शिवसेनेसमोर आहे तर या प्रभागात महापौर वाकळेंसह अन्य दोन नगरसेवक भाजपचे असल्याने ही जागा भाजपला मिळवण्याचे आव्हान शहर भाजपसमोर आहे.
भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे व शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या प्रभाग ६ मधील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (६ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. या निवडणुकीत शहराचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो, यावर शहरातील ‘राजकीय मित्रत्वा’वर टीकाटिप्पणी झडणार आहे.
महापालिकेच्या प्रभाग ६ अ या अनुसूचित जमाती महिला राखीव जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत भाजप व शिवसेना यांच्यात सरळ लढत होत आहे. अनिता दळवी यांचा शिवसेनेकडून व पल्लवी जाधव यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज आहे.
नगर-मनमाड महामार्गालगतच्या कराळे हेल्थ क्लबपासून मेघनंद रिसोर्ट, अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, आयसीएफएआय नॅशनल कॉलेज, ऑक्सिलियम कॉन्व्हेंट हायस्कुल, श्रीसिद्धीविनायक कॉलनी, सावेडी बसस्टॉप, अश्मिरा नर्सरी, श्रीनाथ सोसायटी, सावेडी गावठाण, डौले हॉस्पिटल, न्यू प्रेमदान हडको, गणपती मंदिर, साई कॉलनी, नाना-नानी पार्क,
महालक्ष्मी उद्यान, भिंगारदिवे मळा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, बोरुडे मळा अशी व्याप्ती असलेल्या या प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी १३ हजार ६२१ मतदार आहेत. त्यांच्यासाठी १६ मतदान केंद्रे करण्यात आली असून, गुरुवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com