संगमनेरातील व्यापाऱ्याचा खून करणारी व सराफाकडील तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने लांबवणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
संगमनेर येथे ५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेने गुन्ह्यातील तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आरोपींना अटक केली.
गणेश राजेंद्र गायकवाड (३३, रा. घुलेवाडी, एरिगेशन कॉलनी, संगमनेर), दीपक विनायक कोळेकर (३४, सिडको, त्रिमूर्ती, चौक, नाशिक, हल्ली मु. बुधवार पेठ, नाईकवाडी, नाशिक), भरत विष्णू पाटील (२६, पंचवटी गंगा, नाशिक) अशी अटक केलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.
त्यांना संगमनेर व नाशिकमधून सापळा लावून अटक करण्यात आली. गुन्ह्यातील इतर आरोपी अविनाश जगन्नाथ मारके (घुलेवाडी, संगमनेर), समाधान कुंडलीक गोडसे (परीते, सोलापूर, हल्ली मु. वाघोली, पुणे) व नीलेश (पूर्ण नाव माहित नाही) आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.
या फरार आरोपींचा पोलिसांनी मुंबई, रायगड, पुणे, सोलापूर आदी ठिकाणी जावून शोध घेतला मात्र हे आरोपी अद्याप सापडलेले नाहीत.