अहमदनगर :– शहर बॅंकेच्या बोगस कर्जप्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. निलेश शेळके याचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर तो फरार झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखासह स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके फरारी शेळकेच्या शोधातासाठी कार्यरत आहे. परंतू, शेळके हा पोलिसांना चकवा देत असून, तो पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसही हतबल झाले आहे.
एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. निलेश शेळके याने अनेक डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतले. त्यानंतर शहर सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाला हाताशी धरून संबंधित डॉक्टरांच्या नावाने कर्ज घेत त्या रकमेचा अपहार केला. या प्रकरणी दोन महिलांसह एकूण तीन डॉक्टरांनी प्रत्येकी पाच कोटी 75 लाख रुपयांची फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
डॉ. रोहिणी सिनारे, उज्ज्वला कवडे, डॉ. श्रीखंडे यांनी फिर्याद दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने डॉ. शेळके याचा जामीन फेटाळत 27 जानेवारी पर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु डॉ. शेळके हजर झाला नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी त्यानुसार पथकाला तपासाच्या सूचना दिल्या असून अद्यापही शेळके सापडला नसल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
डॉ. निलेश शेळके याने जामिनासाठी जिल्हा न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत धडपड केली. परंतु तिन्ही न्यायालयांनी बोगस कर्जप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. शेळके याचा जामीन फेटाळला. त्यामुळे डॉ. शेळके याच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. याच बरोबर शहर बॅंकेच्या संचालकांच्या अडचणीतही वाढ होण्याची चिन्हे आहेत. डॉ. निलेश शेळके नेमका कोठे लपून बसला आहे, याचा शोध सुरु आहे.