नागपूर : पन्नास रुपयांची दारू पिल्यानंतर केवळ ४५ रुपये दिले म्हणून एका दारूविक्रेत्याने युवकाचे लाकडी फळीने मारून दोन्ही पाय फ्रॅक्चर केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी दारूविक्रे त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल बबन काळे (२६, रा. इमामवाडा, नागपूर) असे जखमी युवकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, राहुल काळे याला दारूचे व्यसन आहे.तो २ फेब्रुवारीला अनिल शेंडे नावाच्या त्याच्या मित्रासोबत परिसरात राहणारा आरोपी संतोष ऊर्फ रमेश देशमुख याच्या घरी गेला.
रमेश हा चोरून देशी दारूविक्री करीत होता. त्याच्या घरी अनिल आणि राहुल यांनी ५० रुपयांची दारू ढोसली. परंतु, त्यांच्याकडे ४५ रुपये होते. पाच रुपये कमी दिल्यामुळे देशमुख आणि राहुल यांच्यात वाद झाला.
दारू पिऊन असलेल्या राहुलला देशमुखने लाकडी फळीने जबर मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही पायांचे हाड मोडल. तो सायंकाळच्या सुमारास मेडिकलमध्ये गेला. तिथे त्याने डॉक्टरांना घराच्या जिन्यावरून पडल्याचे सांगितले. उपचार घेऊन आल्यानंतर त्याने आईसोबत इमामवाडा पोलीसठाणे गाठले आणि तक्रार दिली.