श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावचे उपसरपंच भास्कर कारभारी ढोकचौळे उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रद्द केले आहे. उपसरपंच ढोकचौळे यांनी मुलाच्या नावावर गावातील पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम केले होते.
खंडाळा गावातील शाहू-फुले चौकात सुमारे 2 लाख 80 हजार रुपये खर्चून पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले होते. उपसरपंच भास्कर ढोकचौळे यांचा मुलगा अमोल याने हे काम केले होते. माजी सैनिक आणि ग्रामस्थ महेश ढोकचौळे यांनी आक्षेप घेतला होता.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासमोर या प्रकरणाची चौकशी झाली. उपसरपंच भास्कर ढोकचौळे यांच्या वतीने बचाव करण्यात आला की, मुलगा अमोल हा सिव्हिल इंजिनिअर आहे. त्याने रितसर निविदा भरली आहे.
कायदेशीर प्रक्रियातून ही निविदा मंजूर झाली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर बिल दिली आहे. तक्रारदार महेश ढोकचौळे यांच्यावतीने अॅड. योगेश गेरंगे यांनी म्हणणे सादर केले.
उपसरपंच आणि त्यांचा मुलगा यांचे रेशनकार्ड एकच आहे. त्यांचे कुटुंब हे एकत्र पद्धतीचे आहे. मतदार यादीत ही त्यांचा घर नंबर एकच आहे. हे म्हणणे जिल्हाधिकार्यांनी ग्राह्य धरून पद रद्द केले.