वडोदरा : गुजरातच्या डोडा जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात मोफत चहा व स्नॅक्स देणारा कॅफे सुरू करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत डोडा तहसीलमध्ये सुरू केलेला हा राज्यातील पहिला कॅफे असल्याची माहिती सोमवारी एका अधिकाऱ्याने दिली.
आदिवासीबहुल डोडा जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाच्या समोर हा प्लास्टिक कॅफे सुरू करण्यात आला आहे.
या कॅफेवर एक किलो प्लास्टिक कचरा घेऊन येणाऱ्यास मोफत स्नॅक्स तर अर्धा किलो प्लास्टिक कचरा घेऊन येणाऱ्या व्यक्तीला मोफत चहा दिला जाणार आहे.
गुजरात सरकारच्या ‘सखी मंडळ योजना’ याअंतर्गत महिलांनी तयार केलेले स्नॅक्स प्लास्टिकच्या बदल्यात देण्यात येणार आहे.